मी उर्मिला...
योगेश नाईकवाडी, मानसोपचारतज्ञ, समुपदेशक ज न वि गढी, बीड
सुरूवात कुठून करू आणि कशी करू हेच सुचत नाही, पण आज फेसबुकवर खुपजणांनी राम-सीता, राम-लक्ष्मण यांच्या त्यागाबद्दल भरघोस लिहिलेलं बघितलं. मी मध्येच, “उर्मिला बद्दल तुम्हाला काय वाटतं" असं विचारलं तर मला अपेक्षितच उत्तर मिळालं, कोण ही उर्मिला? आज दोन-अडीच हजार वर्षांनंतर मला राहुन-राहुन सांगावसं वाटत आहे की, उर्मिला कोण होती, आणि विचारावेसे वाटते की तिचं नेमकं चुकलं तरी काय होतं, ज्याकारणी तिचं आर्यावर्तातून विस्मरण झालं ?
मी उर्मिला मला माहितेय संपूर्ण आर्यवर्तात मला क्वचितच कोणी ओळखत असेल. महाराज जनक आणि महाराणी सुनैना यांची द्वितीय कन्या (जनुकीय दृष्टीने प्रथम, कारण सीता दिदी तर भूमातेची देणगी!) अर्थातच इथं सीता दिदीला कमी लेखायचं नाहीये कारण माझ्या जन्मापासूनच तिचं आम्हांवर खूप प्रेम होतं. स्वयंवरात श्रीरामांनी शिवधनुष्य पेललं अन् तिच्याशी सोयरिक जुळवली, पण सीता दिदीनं आम्हालाही जावू म्हणून अयोध्येत मोठ्या थाटात सोबतीला नेलं. असं म्हणतात नाती स्वर्गात आधिच जुळवलेली असतात, पृथ्वीलोकावर फक्त त्यांचा मिलन होतं, याला आम्ही 'याची देही याची डोळा' अनुभवत होतो. ना कोणी स्वयंवरांसाठी विचारलं, ना कोणी तुझी इच्छा काय आहे असं विचारलं.(काही आक्षेप नाही, कारण माहितेय बाबा आमचं नक्कीच काही वाईट होऊ देणार नव्हते.)
लग्न झालं, आयुष्याची नवीन सुरूवात होणार होती. अयोध्येत आल्यावर सासर मंडळींचं मन कसं जिंकायचं याचे सर्वपरी प्रयत्न चालू होते, पती सोबत संसाराची गोड स्वप्न पाहत होते. एवढं सगळं सुरळीत चाललेलं नियतीला थोडीच बघवणार...अचानक एके दिवशी अयोध्येच्या आनंदाला कैकयीच्या पुत्रप्रेमाचं ग्रहण लागलं. माझ्या स्वप्नांचा, 'श्रीराम वनवासाचा' आणि 'भरत राज्यभिषेकाचा' दुरवर संबंध नव्हता. त्याचा परिणाम श्रीराम यांच्यावर (राज्यभिषेकाचे हक्कदार म्हणून) अन् त्यांची अर्धांगिनी सीता दिदीवर पण पडला असता... इथपर्यंत सगळं समजण्याइतपत होतं, पण त्याचा परिणाम मलाही १४ वर्षे भोगावा लागेल हे माझ्यासाठी अनाकलनीय होतं.
महाराज दशरथ यांनी कैकयीला दिलेलं वचन, रघुकुल नितीनुसार श्रीरामांनी ते पालन करण्याला दिलेला होकार, आपसुकच तो सीता दिदी वर येणार होता (त्यांच्या सोबत जाणे न जाणे, तिचा तो निर्णय ऐच्छिक होता), या जोडीसोबतचं लक्ष्मणांनी सुध्दा अयोध्येसकट माझ्यावर तुळशीपत्र ठेवलं आणि ते ही मला पूर्वकल्पना न देता! अर्धांगिनी होती ना मी त्यांची ? अग्णिसाक्षीने वचने घेतली होती ना दोघांनी? मग ती न पाळणे यांच्या रघुकुल नितीमत्तेत बसत होतं का?
पित्याचं पुत्रावर, भावाचं भावावर आणि पत्नीचं पतीवर प्रेमाचं ते अद्भुत दर्शन होतं. त्यांच्या त्यागाची भावना सगळ्यांनी आजपर्यंत समजून घेतली. हो, सीता-राम हे लक्ष्मी-नारायणाचा अवतार आहेत. मला त्यांचा सहवास लाभला त्यासाठी मी स्वत:ला खुप भाग्यवान समजते. पण एवढ्या सगळ्यात माझ्या भावनांचा विचार करावा असं कोणालाही का बरं वाटलं नाही? अरे हिचा पती वनवासाला जातोय, पत्नीला पण सोबत घेऊन जा, असं कोणाला म्हणावसं का वाटलं नाही?
त्या तिघांच्या त्यागामुळं, त्यांच्या कर्तृत्ववामुळं मनुष्य योनीत जन्म घेऊनसुध्दा त्यांना देवत्व प्राप्त झालं. पूर्ण आर्यावर्तात लहानांपासून-थोरामोठ्यांपर्यंत कोणालाही विचारलं तरी त्यांना राम-लक्ष्मण, सीता-राम, राजा भरत इ. माहित असतील त्यांचा त्याग पण सर्वश्रुत आहे. तेव्हा त्या लक्ष्मणाच्या पत्नीवर काय आभाळ कोसळलं असेल? तिचा त्याग, तिनं काय भोगलं असेल? नवीन नवरीच्या स्वप्नांच काय झालं असेल? असे अमाप प्रश्न तयार झाले असते बघणार्याच्या मनात, पण आजच्या घडीला त्यावर विचार तर सोडाच कित्येक जणांना तिचं साधं नाव ही माहीत नसेल, ही किती मोठी शोकांतिका असेल ना माझ्यासाठी ?
ते मला सोडून जाणार होते, त्यांना त्यांच्या भावा प्रती असलेल्या प्रेमात पत्नीचा त्याग करावा वाटला तो त्यांनी केला. त्यांनी जावं, देवासमान राम-सीता यांची सेवा करावी यासाठी मी स्वत:च्या स्वप्नांची आहुती देऊन होकार तर दिलाच होता की, त्यांना अडथळा नको म्हणून मी त्यांच्या सोबत जाणारही नव्हते. आणखी काय हवं होतं त्यांना पत्नी म्हणून माझ्याकडून?..... पत्नी म्हणून पतीकडून काही अपेक्षा न ठेवता माझं सर्वस्व श्रीराम चरणी अर्पण केलं होतं. इथपर्यंत तरी सगळं ठिक होतं असं समजत होते परंतु इतकं केलेलं सगळं कमी होतं कि काय, त्यांनी त्यांच्या वाट्याची १४ वर्षांची घोर निद्रा माझ्या माथी मारली. त्यांच्या पश्चात त्यांच्या परतीची आशा..... सासरच्या लोकांची सेवा करायचं भाग्य.....१४ वर्षांचा प्रेमभंग..... इ. कशाचाच विचार करावा असा त्यांना का वाटलं नाही? कुठे गेली महर्षि वसिष्ठांनी दिलेली धर्म, नितीमत्ता यांची शिकवण? आपण आपल्या बंधु प्रेमात इतके आकंठ बुडालो आहोत की, आपण आपल्या पत्नीवर नकळत का होईना किती अन्याय करतोय याचं साधं भान राहू नये. यात आर्यावर्ताचा तर कुठे दोष आहे. माझं त्यांच्या प्रती कोणतं असं उल्लेखनिय कार्य नव्हतचं, बरं करावं म्हणलं तरी करणार तरी कसं मी माझ्या पतीसाठी १४ वर्षांच्या निद्रावस्थेत जी होते. कोणाचंही विस्मरण होण्यासाठी एवढा भलामोठा काळ पुरेसा आहे.
अयोध्या म्हणलं की, रामायणातील मोजक्याच व्यक्तिंचं कार्य, त्याग न आठवता माझ्या सारख्या अगणित लोकांच्या त्यागावर त्यांना देवत्व प्राप्त करण्याची संधी मिळाली याची लोकांनी कमीत कमी आठवण ठेवावी एवढीच अपेक्षा!!! सगळ्यांनाच लक्षात ठेवणं खूप अवघड आहे. त्या सगळ्यांना आठवण ठेवा असंही नाही म्हणत त्यांच्या प्रती थोडीशी कृतज्ञता जरी ठेवली तरी बस झालं. महत्त्वाचं म्हणजे रामायणातील ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या तुमच्या आचरणात आणल्या तरी सगळ्यांचं कल्याण होईल. राम राज्याच वातावरण तयार होईल. आर्यावर्तात पूर्वी प्रमाणे सुखसमृद्धी नांदेल.
एवढं रामायण ऐकल्यानंतर तुम्हाला पुन्हा हा प्रश्र्न पडू नये कि, ही स्वत:ची व्यथा मांडणारी स्त्री आहे तरी कोण?
मी आहे मिथिला नरेश महाराज जनक व महाराणी सुनैना यांची कन्या... महाराज दशरथ व महाराणी सुमित्रा यांची स्नुषा.... आणि राजकुमार लक्ष्मण यांची अर्धांगिनी... उर्मिला...!!!
'उर्मिला' यांच्या मनातल्या भावनेला माझ्या शब्दांची तोकडी जोड दिली. त्यांची ही भावना २-२.५ हजार वर्षांपूर्वी मी जर असतो तर लक्ष्मण यांच्यापर्यंत नक्कीच पोहचवली असती. आजच्या कलियुगात ती तुमच्या पर्यंत पोहोचली असेल तर त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.
आज उर्मिला यांची आत्मकथा लिहायचा प्रयत्न केला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. कोणाच्या भावणा दुखावल्या असल्यास माफी असावी.