वडील नसलेल्या मुलीचे जीवन

अनुजा लादे , 11 B

Mar 11, 2026 - 13:06
Mar 20, 2026 - 07:55
 4
वडील नसलेल्या मुलीचे जीवन

वडील नसलेल्या मुलीचे जीवन
- अनुजा लादे, 11 B


ही एखादी गोष्ट किंवा कल्पना नाही, तर “प्रेरणा” नावाच्या एका मुलीच्या आयुष्यात घडलेली सत्य घटना आहे. ती म्हणते की माझ्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्या मी कधीही विसरू शकत नाही. या घटनांनी माझे आयुष्य असे बदलले की माझ्या संपूर्ण परिवाराची झोपच उडाली.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी कोणती घटना? तर २०१७ साली माझी आजी हृदयविकाराच्या झटक्याने आम्हाला कायमची सोडून गेली. तिच्या जाण्यानंतर माझ्या आजोबांनी अंथरुण धरले आणि ते पुन्हा कधीच उठले नाहीत. कशीबशी दोन वर्षे गेली, ते थोडे बरे होऊ लागले होते; परंतु त्याच दरम्यान माझ्या मामाने—म्हणजेच आत्याच्या पतीने—गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना जेव्हा माझ्या आजोबांना समजली, तेव्हा मुलीची अशी अवस्था पाहून ते पूर्णपणे खचून गेले आणि अवघ्या १९ व्या दिवशी माझे आजोबाही आम्हाला सोडून गेले. एका महिन्याच्या आत बहिणीवर आलेले हे संकट आणि वडिलांचा मृत्यू यामुळे माझे वडील पूर्णपणे कोलमडून पडले. त्यांनी कसेबसे स्वतःला सावरले; परंतु एका वर्षाच्या आत माझे वडीलही आम्हाला सोडून गेले.
यानंतर सावरण्याची हिंमत कोणाकडेच उरली नव्हती. ही सगळी संकटे आली तेव्हा मी फक्त सातवीत शिकत होते. माझ्या वडिलांच्या निधनाला एक महिना देखील पूर्ण झाला नव्हता, तेव्हाच आमचे नातेवाईक माझे लग्न लावण्याचा विचार करू लागले. ते म्हणत, “लवकर मुलीचं लग्न करून टाका, नाहीतर तिला सांभाळणार कोण?” एका अर्थी त्यांचं म्हणणं खरंही वाटत होतं, कारण आमच्या घरात पुरुष आधार म्हणून उरलेलाच नव्हता. आजोबा, काका, मामा, वडील—कोणीच घरचा उरलेला नव्हता.
माझ्या आईची अवस्था पाहून माझी आजीही आधीच खचून गेली होती. माझी आई खूप भोळी आहे. तिने बाहेरचं जग फारसं पाहिलेलं नाही. तरीसुद्धा सर्वांच्या विरोधात जाऊन तिने माझ्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय घेतला—तो म्हणजे माझं लग्न न करण्याचा. त्या निर्णयामुळे मला थोडा आधार मिळाला, पण मनात वाईटही वाटलं; कारण माझ्यामुळे तिला सर्वांचे टोमणे सहन करावे लागत होते.
माझी इच्छा होती की चांगल्या शाळेत शिक्षण घेऊन आईसाठी काहीतरी करावं; पण तेही जणू देवाला मान्य नव्हतं. वडील गेल्यापासून अनेक लोक आमच्याकडे येऊन फक्त एवढंच म्हणू लागले की, “तुझ्या पप्पांनी आमच्याकडून पैसे घेतले होते, ते परत पाहिजेत.” असे करता-करता आमच्यावर जवळपास ३० लाख रुपयांचे कर्ज असल्याचं सांगितलं गेलं, जे कर्ज घेतलं गेलं आहे हे कोणालाही ठाऊक नव्हतं. वडील असताना कोणीही पैशासाठी कधीच आले नव्हते. लोकांचं खरं-खोटं कशावरून ठरवायचं? कारण माझ्या वडिलांना कोणतेही व्यसनही नव्हते. मग आम्ही हे कर्ज खरं कसं मानायचं? आणि नकार दिला तर ते लोक आम्हाला खूप त्रास द्यायचे.
थोडंफार कर्ज असतं, तर ते फेडणं शक्य होतं; पण तीस लाख रुपये आम्ही कुठून आणणार? यानंतर माझी आई अधिकच खचू लागली. “मुलांना कसं शिकवायचं? मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे? मी एकटी शेतात कसं काम करणार?” या विचारांनी ती थकून गेली. शेवटी आम्ही शेती दुसऱ्याला दिली; पण लोकांनी तिला तेही नीट करू दिलं नाही.
आज आमची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की माझ्या आईला जगण्याचीसुद्धा इच्छा उरली नव्हती. तरीही ती आमच्याकडे पाहून जगत होती. माझ्या आयुष्यात आजपर्यंत जर एखादी चांगली गोष्ट घडली असेल, तर ती म्हणजे मला नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्याचं सौभाग्य मिळालं. इथे मला माझ्या आईसाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली.
तरीही मनात भीती आहे—कारण माझे नातेवाईकांना जर कळलं की मी बाहेर शिकत आहे, तर ते आईला अधिक त्रास देतील. पण आता मला माझी स्वप्नं पूर्ण करून, माझ्या आईला एकदा तरी चांगलं आयुष्य द्यायचं आहे.